"ओबीसीमधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाहीच"; पंढरपुरात भुजबळांचा एल्गार

आज चित्र बदललेले आहे, संदर्भ बदललेले आहेत, अन्याय करणारे बदललेले आहेत. आपण सर्वांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्यावर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उभे रहावे लागेल, एकमुखाने बोलावे लागेल!, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
"ओबीसीमधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाहीच"; पंढरपुरात भुजबळांचा एल्गार

“तुम्हाला आरक्षण पाहिजे ना? त्याला आमचा पाठिंबा आहे. पण ते आरक्षण स्वतंत्र घ्या. पण, यांचे म्हणणे आहे की, ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. मिळणार नाही. ओबीसीमधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाहीच”, असे वक्तव्य राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसींच्या एल्गार सभेत ते बोलत होते.

मृत्यूमुखी पडले त्यांचे काय?

समोरच्या लोकांच्या मागण्या खूप आहेत. ती गरीब लेकरे आहेत. त्यांची लेकरं-बाळं गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे. फुलं उधळण्यासाठी 200 जेसीबी आहेत, ते गरीब आहेत. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय, ते गरीब आहेत. हे करत असताना, खरोखरच मराठा समाजाचे जे गरीब कार्यकर्ते आहेत, सभेला आले अपघातात गेले. माझ्या मतदारसंघातीलही काही जण तिथे गेले. जेसीबीच्या अपघातात एक जण स्वर्गवासी झाले. अरे त्यांना श्रद्धांजली तर अपर्ण करा. जे मृत्यूमुखी पडले त्यांचे काय? त्यांची त्यांना आठवण नाही”, असेही भुजबळ म्हणाले.

पांडुरंग हा सगळ्यांचा आहे-

पांडुरंग हा सगळ्याचा आहे. मी मागच्या वेळी देखील सगळ्या संतांची नावे वाचून दाखवली होती. या सगळ्या संतांचे म्हणणे एकच आहे. सगळे एकत्र येऊ. निवडणूक आली की सगळ्या पक्षांचे नेते पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातात. तेव्हा त्यांना अडवले जात नाही. मग आरक्षणाच्या वेळेसच का अडवले जाते, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ती मराठा सेना नव्हती -

शिवरायांच्या नावावरुन आम्हाला बोलले जाते. पण लक्षात ठेवा छत्रपतींची मराठा सेना नव्हती, ती मावळ्यांची सेना होती. छत्रपतींची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधून काढली. पहिली शिवजयंती फुलेंनी सुरु केली. पहिला पोवाडा फुलेंनी रचला. शिवाजी महाराजांचे नाव घेता आणि आमच्यावर हल्ले करता, असा सवाल देखील भुजबळांनी केला.

आरक्षणाच्या नावाखाली असलेल्या झुंडशाहीला विरोध -

माझ्याविरुद्ध प्रकार करणारे लोक त्यांना सांगायचं आहे. मी मराठा समाजाला आरक्षणासाठी नेहमी पाठिंबा दिला आहे. त्यांना आरक्षण वेगळे द्या. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण,मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे, असे देखील भुजबळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in