छगन भुजबळ ठाकरे गटाच्या संपर्कात? गुप्त बैठकीनंतर 'शिवसेना उबाठा'त घरवापसीची चर्चा

छगन भुजबळ ठाकरे शिवसेना गटाच्या संपर्कात असून ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांची त्यांच्याशी गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे.
छगन भुजबळ
छगन भुजबळ
Published on

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर महाराष्ट्रात नवा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची छगन भुजबळ यांच्याशी गुप्त भेट झाल्याचंही बोललं जात आहे.

भुजबळ नाराज असल्याची चर्चा...

गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुका लढवण्याची इच्छा असूनही त्यांनी तिकीट मिळालं नव्हतं. त्यानंतर राज्यसभेसाठीही ते इच्छुक होते, मात्र त्यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय ओबीसी आरक्षण-मराठा आरक्षण यादरम्यानही विविध गोष्टींमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची त्यांची भावना होती. त्यामुळं कार्यकर्त्यांचाही मोठा दबाव त्यांच्यावर होता. त्यामुळंच छगन भुजबळ पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात.

भुजबळ ठाकरे शिवसेना गटाच्या संपर्कात...

नाराज असलेले छगन भुजबळ ठाकरे शिवसेना गटाच्या संपर्कात असून ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांची त्यांच्याशी गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान छगन भुजबळ यांची पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटामध्ये घरवापसी कशी करता येईल, यासाठीची चर्चा झाल्याचं समजतंय.

भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक...

छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून त्यांनी अनेक वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई महानगरपालिकेचे महापौर म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यानंतर ते आमदारही झाले होते. नंतर काही कारणांमुळं त्यांनी पक्षाकडून फारकत घेतली आणि आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान अनेक वर्षानंतर आता पुन्हा एकदा भुजबळांच्या घरवापसीची चर्चा होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in