

पुणे : पुण्यातील महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक निवासस्थानाच्या म्हणजेच फुलेवाडा विस्तारीकरण प्रकल्पाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भुजबळ म्हणाले की, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शासनाने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असूनही प्रत्यक्ष कामाची गती समाधानकारक नाही. मुख्यमंत्री या प्रकल्पाचा सातत्याने आढावा घेत असून, आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन पूर्णपणे तयार आहे. आता प्रशासनाने मरगळ झटकून कामाला युद्धपातळीवर गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प केवळ इमारतीच्या विस्तारीकरणापुरता मर्यादित नसून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा आणि सामाजिक कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मात्र, प्रशासकीय विलंबामुळे या महत्त्वाच्या प्रकल्पाला अडथळे निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. फुलेवाड्यात अलीकडेच झालेल्या पूजा प्रकरणावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.