भुजबळांविरोधात मराठा एकवटणार! मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा छगन भुजबळांना विरोध आहे. त्यातच जर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे
भुजबळांविरोधात मराठा एकवटणार!  मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी येथील दावा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे तिढा असल्याचे मानले जात आहे. परंतु ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास मंत्री छगन भुजबळच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भुजबळांना शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत मराठा क्रांती मोर्चा अशी दुहेरी लढत द्यावी लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचा छगन भुजबळांना विरोध आहे. त्यातच जर भुजबळ यांना नाशिकमधून उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची कोंडी होऊ शकते. महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली असून, येथे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरविले आहे. त्यातच भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाराज होऊ शकतात. तसेच त्यांचे कार्यकर्तेदेखील उघडपणे विरोध करू शकतात. त्यातच मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्यास भुजबळांना मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, असे बोलले जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच भुजबळ यांनी नाशिकमधून आपल्याला उमेदवारी द्यावी, असे दिल्लीतूनच आदेश आले असल्याचे म्हटले आहे. त्यातच महायुतीच्या बैठकीत भुजबळ यांचेच नाव पुढे रेटले जात आहे. सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आग्रही होता. परंतु तेथे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांना पर्यायी मतदारसंघ म्हणून नाशिक देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात असून, तसे झाल्यास भुजबळच मैदानात उतरू शकतात. लवकरच त्यांच्या नावाची घोषणाही होऊ शकते. परंतु ते मैदानात उतरल्यास मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, असेही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यातच मराठा क्रांती मोर्चाने नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास मराठा क्रांती मोर्चा त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी हा इशारा दिला.

भुजबळांच्या उमेदवारीचा हट्ट का?

छगन भुजबळ यांच्या उमेदवारीचा जाणीवपूर्वक आग्रह धरला जात आहे. यामागे भाजपसह शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष यांचा हात आहे. भुजबळ यांना पुढे करून हे तिन्ही पक्षांचे नेते स्वत:वर रोष ओढवून घेत आहेत. मात्र, त्यांचा हेतू कधीही साध्य होणार नाही, असेही मराठा क्रांती मोर्चाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in