

पुणे : मी सरकारमधल्या एका पक्षाचा एक आमदार आहे. म्हणूनच मी सांगतोय की आता इथे उपोषण करायला मी मोकळा असल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. महात्मा फुले वाड्याच्या रखडलेल्या कामावरून आक्रमक भूमिका घेत छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला हा इशारा दिला.
महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ पुण्यामध्ये आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, जेव्हापासून महात्मा फुलेवाडा वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे. तेव्हापासून आणि त्यापूर्वीपासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यास जागा नाही, अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. हे १०० ते २०० कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांशी आणि लोकांशी संवाद साधून जागा मोकळी करून घेणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते त्या पद्धतीने या जागेचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवाटोलवी करत आहे.
याप्रकरणी लवकरच निर्णय न घेतल्यास मला इथे आंदोलन करावे लागेल, असा इशारा देत भुजबळांनी दिला. तसेच, मी फक्त सरकारमधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर थोडीशी अडचण होते, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.
इतिहास हा इतिहास म्हणून समोर आला पाहिजे
महात्मा फुले यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. महात्मा फुले यांच्याबाबत मराठीमध्ये चित्रपट आले असले तरी पहिला हा हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी भेट घेतली त्यावेळेस अनेक पुस्तकांचा विचार करून चित्रपट बनवला आहे, चित्रपट बनवताना कोणतीही लिबर्टी घेतली नाही. एखाद्या गोष्टीबाबत आक्षेप असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो, असे त्यांनी सांगितले आहे. चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने देखील परवानगी दिली आहे. हे खरे आहे की त्या काळातील कर्मठ ब्राह्मणांनी काही गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे इतिहास हा इतिहास म्हणून समोर आला पाहिजे. महात्मा फुले यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येत आहे, याचा मला आनंद आहे. त्यामुळे मला वाटते कोणीही विरोध करू नये, असे देखील छगन भुजबळ यांनी सांगितले.