भुजबळांच्या उमेदवारीची फक्त घोषणा होऊ द्या: जरांगे-पाटील

महायुतीतल्या जागांचा तिढा अद्याप कायम आहे. नाशिक मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दहा वर्षे या ठिकाणचे खासदार आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना गोडसेंचे नावही जाहीर केले होते. त्यानंतर भाजपमधील नाराजी बाहेर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा आहे.
भुजबळांच्या उमेदवारीची फक्त घोषणा होऊ द्या: जरांगे-पाटील

प्रतिनिधी/मुंबई

नाशिकच्या लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही महायुतीत कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा या जागेवर दावा आहे. भाजपलाही ही जागा हवी आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही नाव या मतदारसंघासाठी चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी इशारा देताना, नाशिकमधून छगन भुजबळ यांनी उभे रहावे. त्यानंतर मी माझी भूमिका सांगतो, असे स्पष्ट केले आहे. यामुळे भुजबळ उभे राहिल्यास जरांगे-पाटील नेमकी काय घोषणा करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महायुतीतल्या जागांचा तिढा अद्याप कायम आहे. नाशिक मतदारसंघाचाही त्यात समावेश आहे. शिंदे गटात असलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दहा वर्षे या ठिकाणचे खासदार आहेत. खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना गोडसेंचे नावही जाहीर केले होते. त्यानंतर भाजपमधील नाराजी बाहेर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

जरांगे-पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते रविवारी पुण्यात होते. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीच्या शक्यतेबाबत विचारले असता, मनोज जरांगे म्हणाले, भुजबळांबद्दल जास्त काही विचारू नका. त्यांची उमेदवारी जाहीर होऊ देत मग मी माझी भूमिका जाहीर करतो, असे जरांगे-पाटील म्हणाले.

जरांगे भुजबळांच्या विरोधात दंड थोपटून मैदानात उतरणार?

मनोज जरांगे-पाटील हे आरक्षणाबाबतचे आंदोलन करत असताना त्यांच्यात आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाल्याचे दिसून आले होते. मराठा विरुद्ध ओबीसी असा हा संघर्ष होता. दोघांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. अनेकदा ही टीका वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचल्याचेही दिसून आले होते. दोघांमधील संघर्ष अगदी टोकाला पोहोचला होता. भुजबळ यांनी तर मंत्रिपदाच्या राजीनाम्यापर्यंतची तयारी दर्शविली होती. आता छगन भुजबळ हे जर खरोखरच नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले, तर मनोज जरांगे काय भूमिका जाहीर करतात हे पहावे लागणार आहे. जरांगे केवळ भूमिका जाहीर करून शांत बसणार की, भुजबळांच्या विरोधात प्रचारालाही दंड थोपटून मैदानात उतरणार हे येणारा काळच सांगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in