विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात माझ्या उपस्थितीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. ही चर्चा ४० ते ४५ मिनिटे चालली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला.
विलीनीकरणाची माझ्यासमोरच चर्चा; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट
Published on: 

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात माझ्या उपस्थितीत विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. ही चर्चा ४० ते ४५ मिनिटे चालली होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाबाबत गांभीर्याने चर्चा सुरू होती, यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे.

आपल्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर अजित पवार मला भेटले होते. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते. यावेळी चर्चेदरम्यान दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी भूमिका आपण मांडली होती. अजित पवार चांगले नेतृत्व करत आहेत, त्यामुळे एकत्र आले पाहिजे, असे आपण त्यांना सांगितले होते. या चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी एकत्र येण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही एनडीएमध्ये सत्तेत आहात, त्यामुळे तुमच्या सहयोगी पक्षांना हे मान्य होईल का, असा सवाल त्यांनी केला. या संदर्भात चर्चा होऊ शकते, असे आपण सांगितले. मात्र, या चर्चेनंतर पुढे काही घडले नाही, असे ते म्हणाले.

सुनेत्रा पवार विश्वासात घेतील

विलीनीकरणाच्या निर्णयाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी सुनेत्राताई आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)