
बीड : आरक्षण सामाजिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ‘ओबीसीं’च्या हक्कासाठी दुहेरी लढाई आम्ही लढणार आहोत. एक लढाई न्यायालयात तर दुसरी लढाई रस्त्यावर लढली जाईल, असा निर्धार राज्याचे मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात व्यक्त केला.
बीड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा शुक्रवारी पार पडला. या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते.
ते म्हणाले की, मराठा समाज आणि आमच्यात अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरिद्री पाटलामुळे. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण ‘जीआर’ काढला. विखे-पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे की तुमच्या लोकांना आवरा, असेही भुजबळ म्हणाले.
हिशोब करा राज्यात ५४ टक्के ओबीसी, १३ टक्के दलित, ७ टक्के आदिवासी, ३ टक्के ब्राह्मण त्यानंतर मुस्लिम आणि जे शिल्लक राहतात तो मराठा समाज. आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर देणे गरजेचे आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपला आक्रमक इरादा जाहीर केला.
ओबीसींच्या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत. आपल्याकडे केवळ एकच समाज नाही. आपल्याकडे ३७४ जाती आणि समाज आहेत. यांची नावे घेतली तरी अर्धा तास जाईल आणि यांना जर बोलायला वेळ दिला तर येथेच रात्र होईल, असे ते म्हणाले.
आपल्या मेळाव्यात काही लोक घुसवली असण्याची शक्यता आहे. मी असेही ऐकले आहे की काही जण सुतळी बॉम्ब घेऊन आलेले आहेत, ते काहीतरी गडबड करतील, पण त्यांना तिथेच दाबायचे आणि पोलिसांच्या हवाली करायचे. तुम्ही कोणीही इकडे तिकडे पाहायचे नाही. शांततेने आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचे. नेत्यांनी आपले विचार कमीत कमी शब्दांत व्यक्त करायचे आहेत, असे ते म्हणाले.
भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. नगरला आले नाहीत, पंढरपूरला आले नाहीत, बीडला आले नाहीत, कुठला दबाव तुमच्यावर आहे. तुम्ही सांगितले होते तुमच्याबरोबर आहे. मग तुम्ही का नाही आलात ? असा सवाल भुजबळांनी केला.
एका व्यक्तीने जाती-जातीत एवढी भांडणे लावली, माणसात माणूस ठेवला नाही. लोकसभेच्या आधी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये सख्खे दोन भाऊ एकमेकांविरोधात लढले. एक निवडून आला, दुसरा निवडून आला. त्यांच्यामध्ये एकमेकांविरोधात आई-बहिणीवरुन शिव्या सुरू झाल्या. इतके विष पेरले गेले, असे ते म्हणाले.
आमच्या हक्काचे आरक्षण दिल्यास विरोध करणार - मुंडे
मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळे आरक्षण द्या. आमच्या हक्काचे आरक्षण देणार असाल तर त्याला आम्ही विरोध करणार, असा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. येणाऱ्या नगरपंचायत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ओबीसींची ताकद दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली.
मराठा-कुणबी वेगळ्या जाती
मराठा आणि कुणबी या दोन वेगळ्या जाती आहेत, हा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे, सर्वोच्च न्यायालयानेही हेच सांगितले आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास नाही. भाजपच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, ओबीसींच्या ताकदीवर तुम्हाला १४५ आमदार मिळाले आहेत. त्यामुळे यावर मार्ग काढा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.