
नाशिक : पक्षफुटीनंतर भाजपसोबत सत्तेमध्ये आलो, त्यावेळी कृषिमंत्रिपद घेण्यासाठी आपणास आग्रह करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे माध्यम संवादादरम्यान केला. खुद्द पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार माझ्यासाठी आग्रही होते, असा दावाही भुजबळ यांनी केला आहे.
विधिमंडळात मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी रान पेटवले होते. विरोधाची धार लक्षात घेवून मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी दिली. यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता भुजबळ यांनी उपरोक्त दावा केला.
तुम्हाला पाहिजे ते खाते घ्या, अजित पवारांनी ठेवला होता प्रस्ताव
भुजबळ म्हणाले, आम्ही पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये आलो. त्यावेळी अजितदादांनी अर्थ खाते स्वत:कडे घेतले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या, असा प्रस्ताव त्यांनी माझ्यापुढे ठेवला. आमच्यात चर्चादेखील झाली. अजित पवार यांनी कृषी खाते सांभाळा म्हणून मला खूप आग्रह केला. कृषी खाते चांगले आहे, ते तुम्ही घ्या म्हणून सूचना केली. तथापि, मी मुंबईत राजकारण केले असल्याने हे खाते ग्रामीण भागातील व्यक्तीला देण्याची सूचना मी केली. त्यानुसार, ते खाते माझ्याकडे आले नाही.
दत्तात्रय भरणे या पदाला न्याय देतील
"आम्ही शेतकरी प्रश्नांवर नेहमी संवेदनशील असतो. मात्र, त्याची बारीकसारीक माहिती असणारी माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता दत्तात्रय भरणे हे या पदाला न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो. प्रत्येक खाते महत्त्वाचे असते. आपण कसे काम करतो यावर त्याचा यशालेख अवलंबून असतो.", असेही भुजबळ म्हणाले.