भाजपच मोठा भाऊ; भुजबळांचा यू टर्न

विधानसभेच्या जागावाटपावरून खल सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यू टर्न घेत भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे, ते सर्वांचाच सन्मान राखतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे तूर्त तरी...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक सोमवारी येथील गरवारे क्लब येथे पार पडली. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा मिळायला हव्यात, अशी मागणी केली. त्यावरून महायुतीत लोकसभा निवडणुकीदरम्यानच विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात भाजपच मोठा भाऊ म्हणून काम करेल. पण सोबतच मित्रपक्षांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, विधानसभेच्या जागावाटपावरून खल सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळ यांनी यू टर्न घेत भाजपच सर्वात मोठा पक्ष आहे, ते सर्वांचाच सन्मान राखतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे तूर्त तरी जागावाटपाचा वाद बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पाच टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. दुसरीकडे शिंदे गटाला तब्बल १५ जागा मिळाल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसवर अन्याय झाल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत ताकदीने निवडणूक लढण्याच्या दृष्टीने रणनीती आखली जात आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या काल झालेल्या बैठकीत याच पार्श्वभूमीवर चर्चा रंगली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत, असा आग्रह धरला. ऐन लोकसभा निवडणुकीतच विधानसभेचे गणित घालण्याचा प्रयत्न झाल्याने महायुतीतील पक्षांमध्ये खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लगेचच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भाजपच मोठा भाऊ राहील आणि सोबतच सर्वच मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असा विश्वास दिला.

दरम्यान, या मुद्यावरून भुजबळ यांनीच मंगळवारी यू टर्न घेतला असून, विधानसभेत भाजपच आमचा मोठा भाऊ असेल. त्यामुळे विधानसभेच्या सर्वाधिक जागा भाजपलाच मिळतील. परंतु बाकी इतर दोन पक्षांनाही चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय सिरसाट यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने १५ जागा मिळविल्या. त्यामुळे विधानसभेत देखील आम्हाला चांगल्या जागा मिळतील. त्याच पद्धतीने आमचा मान राखला जाईल, असे म्हटले. या निमित्ताने महायुतीतील विधानसभेच्या जागावाटपावर चांगलाच खल झाला. परंतु उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच मोठा भाऊ राहील, असे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला.

लोकसभेच्या निकालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार

आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा खल सुरू असला तरी खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कसे संख्याबळ असेल, यावरच विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे गणित ठरविले जाऊ शकते. त्यामुळे महायुतीत जागावाटप करताना लोकसभेच्या परफॉर्मन्सवरच सर्व काही गणित अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in