
मुंबई : कोणाच्या ताटातील काढून कोणाला देणार नाही, असे मुख्यमंत्री बोलत आहेत. मात्र, ओबीसीतून मराठा समाजाला शिक्षण, नोकरी यात मोठा वाटा मिळणार आहे. त्यामुळे एका तासात दोन 'जीआर' काढलेच कसे, असा सवाल करत 'भुजबळांना विचारुन जीआर काढला, असा गैरसमज पसरुवू नका', असा इशारा ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर उपोषण केले. सलग पाच दिवस आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांची आझाद मैदानात भेट घेत मागण्या मान्य करून 'जीआर' काढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर एक 'जीआर' काढला, मात्र त्या 'जीआर'मध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना असा उल्लेख केला होता. त्यावर जरांगे पाटील यांनी हरकत घेतली आणि पात्र शब्द वगळण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने दुसरा 'जीआर' काढला आणि पात्र शब्द वगळण्यात आला. जर चुकीचे असेल तर गप्प कसा बसणार, असा इशारा भुजबळ यांनी महायुतीलाच दिला आहे.
'जीआर'मध्ये गडबड
ज्या वेळेला हे 'जीआर' काढले, त्यावेळेस आम्ही वाचल्यानंतर समजले की, यात गडबड आहे. एक दिवस अगोदर मला मुख्यमंत्र्यांनी बोलावले होते. तेथे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते. आता ते सांगतात की, आम्ही त्यांना सांगितले होते. त्यांनी मला सांगितले की, सरसकट शब्द काढला आणि हैदराबाद गॅझेट आपण लागू करण्याचे ठरवले आहे. मग मी हैदराबाद गॅझेटचा उल्लेख दाखवत सांगितले की, कुणबी आणि मराठा वेगळे आहेत. जे कुणबी आहेत त्यांना द्यायला माझी काहीच हरकत नाही. पण भुजबळ यांना विचारून जीआर काढला अशी दिशाभूल करू नका, अशा शब्दांत भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.