मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघातून न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केला आहे. मात्र, माघार घेतानाच महायुतीमधील निर्णय प्रक्रियेच्या विलंबाविरोधात त्यांनी नाराजीही व्यक्त केली. भुजबळ यांच्या या निर्णयाने शिंदे गटाचा या लोकसभेतून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘मी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी’, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सुचवले होते, असेही छगन भुजबळ म्हणाले.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवडणुकीच्या शर्यतीमधून माघार घेतली असली, तरी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होऊन महायुतीची ताकद अधिक वाढवणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. आपण व्यक्तिगतरीत्या माघार घेतली असली, तरी पक्षाने अद्याप या जागेवरून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट करतानाच त्याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत होते. या जागेवर तिकीट मिळविण्यासाठी भुजबळ आग्रही होते, तर शिवसेनेकडून (शिंदे गट) विद्यमान खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. गेले अनेक दिवस या जागेबाबत तर्कवितर्क सुरू होते. मात्र, महायुतीत ही जागा कोणत्या पक्षाला दिली जाईल याबाबत संभ्रम अद्याप कायम आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची शिवसेनेची लोकसभेची जागा भाजपकडे गेल्याने नाशिकची जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भुजबळ यांनी आपली माघार जाहीर केली.
छगन भुजबळ म्हणाले की, होळीच्या दिवशी अजितदादांचा निरोप आला म्हणून आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांनी दिल्लीचा निरोप दिला. गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीमध्ये नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली, तेव्हा अजितदादांनी समीर भुजबळ यांच्यासाठी जागा मागितली. परंतु, अमित शहा यांनी माझे नाव सांगितले. त्यानंतर निर्णय घेण्यासाठी मी एक दिवसाची वेळ मागितली. मात्र, दुसऱ्या दिवशीही माझेच नाव फायनल झाल्याचे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी नाशिकला येऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून मते जाणून घेतली. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवारीबद्दल मोदी, शहा यांचे मानले आभार
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी माझे नाव सुचवल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच नाशिकच्या विकासासाठी मराठा समाजासह विविध समाज बांधवांनी, विविध पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मला जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, असे छगन भुजबळ म्हणाले.
उमेदवारीसाठी उशीर झाल्याने माघारीचा निर्णय
नाशिकमध्ये माझी विविध पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट घेऊन मला पाठिंबा दिला. मराठा, दलित, ब्राह्मण, ओबीसी यासह सर्व समाजांनी नाशिकच्या विकासासाठी मला पाठिंबा दिला. त्यानुसार आम्ही तयारी करण्यास सुरुवात केली. मात्र, तीन आठवड्यांनंतरही उमेदवारी जाहीर झाली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने तीन आठवड्यांपासून प्रचार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारीसाठी उशीर होत असल्याने महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनातील संदिग्धता दूर करण्यासाठी नाशिक लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.