छगन भुजबळांची तोफ उद्या जालन्यात धडाडणार ; सभेला ओबीसी नेते राहणार उपस्थित

मंत्री छगन भूजबळ यांच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे.
 छगन भुजबळांची तोफ उद्या जालन्यात धडाडणार ; सभेला ओबीसी नेते राहणार उपस्थित

राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी सरकार जवळ केली होती. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या (17 नोव्हेंबर) ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेत मंत्री छगन भुजबळ यांची तोफ देखील धडाडणार आहे. त्यामुळे, आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलच तापण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

मंत्री छगन भूजबळ यांच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या आरक्षण बचाव या सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. तर, 'जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा' अशी टॅगलाईन उद्या होणाऱ्या सभेला देण्यात आली आहे.

जालन्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे उद्या ओबीसी नेत्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, काही अज्ञात लोकांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील ओबीसी समाजाची भव्य सभा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जालना पाठोपाठ हिंगोलीमधील सभा देखील विक्रमी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहेत. तर, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास माझा विरोध आहे. तसेच मारवाडी, जैन समाजात देखील कुणबी नोंदी आढळून येतं आहेत. मग तुम्ही त्यांनाही ओबीसीमध्ये घेणार आहात का? असा सवाल शेंडगे यांनी केला आहे.

दरम्यान, ओबीसी सभेवर आता आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीने सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे कोणी सभा घेल्यास आमची कोणतेही हरकत नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीला सर्वसामान्य ओबीसींचा देखील पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे शांततेत सुरु असलेले आंदोलन सुरूच राहणार असं जरांगे म्हणाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in