

नागपूर : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबवताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी तुळापूर व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुलालाही मंजुरी देण्यात आली.
बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तुळापूर - वढू बु. रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात यावा. भीमा नदीवरील पूल केल्याने हा रस्ता साडेसहा किलोमीटरचा होईल. त्यामुळे दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल.
पुलावर 'व्हिवींग गॅलरी'
भीमा नदीवरील हा पूल 'व्हिवींग गॅलरी'सह असावा. पुलाची रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील इतिहासाची आठवण करून देणारी असावी. पूल दर्जेदार निर्मित करून नदीच्या घाटाचे कामही इतिहासाची आठवण करून देणारे असावे. नदी घाट आणि पुलावर प्रकाश योजना आणि सुशोभीकरण दर्जेदार असण्याबरोबर या ठिकाणी गाईडना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांना संपूर्ण ऐतिहासिक संदर्भांची माहिती असावी. अशा पद्धतीने विकास कामे करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
लोकांना पुन्हा येण्याची इच्छा होईल
भीमा नदीवरील पुलाची रुंदी वाहतुकीला पर्याप्त असावी. पूल आणि व्हिविंग गॅलरी येथे येणाऱ्या प्रत्येकाने बघावी, अशा पद्धतीने निर्मित करावी. प्रस्तावित तुळापूर ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी. छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथे महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुन्हा येण्याची इच्छा होईल, अशा पद्धतीने विकास करावा.
असा आहे विकास आराखडा
स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, ८२ आसनी क्षमतेचा १० डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, ३५० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत. समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, १२० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत. तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची' व्हिविंग गॅलरी' असणार तसेच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना.