
संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर शिवसेना ठाकरे गट आता आक्रमक मूडमध्ये असून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार पराभूत झाला. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे ६ ते ८ नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून शिंदे सेनेचे संदीपान भुमरे निवडून आले. पण आता तिथेच भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. संभाजीनगरमधील भाजप पदाधिकारी नाराज असून, आम्ही जिल्ह्यात केवळ शिंदे सेनेचे काम करायचे का? असा सवाल ते विचारत आहेत.
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ठाकरेंना साथ द्या. मूळ शिवसेनेत प्रवेश करा, अशी लोकांची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही याबाबत निर्णय घेत आहोत, असे भाजपचे स्थानिक नेते राजू शिंदे यांनी सांगितले. राजू शिंदेंनी २०१९ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ४३ हजार ३४७ मते मिळवली होती. त्यामुळे राजू शिंदे ठाकरे गटात दाखल झाल्यास ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
रविवारी ठाकरे गटात प्रवेश
येत्या रविवारी, ७ जुलैला भाजपचे ६ ते ८ नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. यात उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांचाही समावेश आहे. भाजपला खिंडार पाडून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची कोंडी करण्याची खेळी ठाकरे खेळत आहेत. गेल्या निवडणुकीत शिरसाटांविरोधात अपक्ष लढून ४० हजारांपेक्षा अधिक मते घेणाऱ्या राजू शिंदेंना पक्षात घेऊन शिरसाटांविरोधात उभे केले जाऊ शकते. त्यामुळे ठाकरे गटाची ‘एकाच दगडात दोन पक्षी’ (भाजप व शिंदे गट) मारण्याची ही खेळी भाजप व शिंदे गटासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.