प्रतिनिधी/मुंबई
छत्रपती संभाजीराजे यांना महाविकास आघाडीने लोकसभा लढविण्याची ऑफर दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीतील एका घटक पक्षात सहभागी होण्याची अट ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तथापि, संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स या समाजमाध्यमावर, 'आपला स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे', असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच त्यांची वाटचाल सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे. पण, महाविकास आघाडीने त्यासाठी एक अट ठेवली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश केला, तर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आल्याचीही चर्चा होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये त्यासाठी एकमत झाल्याचेही म्हणण्यात येत होते.
मात्र आता संभाजीराजे छत्रपती यांनी स्वत: ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. संभाजीराजे यांच्या या ट्विटमुळे ते आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वत: स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.