

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळी परिस्थितीमुळे चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने जनावरे आणि चारा साठ्याचे सर्वेक्षण सुरू केले. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील चारा टंचाईची स्थिती आणि उपलब्ध साठ्याचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
महिनाभर चालणाऱ्या या सर्वेक्षणाद्वारे संपूर्ण परिसरातील चारा टंचाईचे चित्र स्पष्ट केले जाणार आहे. पारंपरिक चारा पिकांची लागवड घटली असून, शेजारील कर्नाटक आणि तेलंगणामध्येही पावसाची कमतरता असल्याने तेथून चारा उपलब्ध करून घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
‘महाराष्ट्राच्या विविध भागांत कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाने जनावरे आणि उपलब्ध चारासाठ्याचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे,’’ अशी माहिती विभागाचे सहआयुक्त डॉ. पुंडलिक बोरकर यांनी दिली.
कुक्कुटपालन उद्योग संकटात
छत्रपती संभाजीनगर: दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील कुक्कुटपालन उद्योगावर परिणाम होऊ लागला आहे. मक्याचे दर वाढून २८ रुपये किलो झाल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. कुक्कुटपालनासाठी प्रमुख खाद्य असलेल्या मक्याचा दर गेल्या वर्षी १८ ते २० रुपये किलो होता. आता तो जवळपास २८ रुपये किलो झाला आहे. मात्र, याच कालावधीत अंड्यांच्या दरात एक-दोन रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र पोल्ट्री ब्रीडर्स अँड फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय नलगीरकर यांनीही अशीच चिंता व्यक्त केली. वाढते तापमान, जास्त आर्द्रता आणि घटता पाणीसाठा यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादक अडचणीत सापडले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, खर्चात झालेल्या एकत्रित वाढीमुळे या भागातील ब्रॉयलर कोंबड्यांचे दर गेल्या वर्षी सप्टेंबरमधील सुमारे १०० रुपये किलोवरून वाढून आता १२५ रुपये किलो झाले आहेत.