

सुजित ताजणे/छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी रोडवरील प्रसिद्ध एशियन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री २.२७ वाजण्याच्या सुमाराला नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. एनआयसीयूतील एसीमध्ये शॉर्टसर्किट होऊन काही क्षणांतच आग आणि धुराचे लोट पसरल्याने रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राधान्य दिल्याने मोठा अनर्थ टळला. तब्बल ७ नवजात बालकांसह सुमारे ५५ रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहाटे गाढ झोपेच्या वेळी अचानक आग लागल्याने रुग्णालयातील रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. एनआयसीयू विभागात उपचार घेत असलेल्या नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. मात्र, अग्निशमन जवानांनी प्रसंगावधान राखत सर्वप्रथम चिमुकल्या बालकांना सुरक्षित बाहेर काढले.
७ नवजात बालकांना सुरक्षित बाहेर काढले
एनआयसीयूतील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असल्याने अग्निशमन जवानांसमोर मोठे आव्हान होते. धुराचे प्रमाण वाढत असतानाही जवानांनी कौशल्याने एनआयसीयू विभागात प्रवेश करून उपचार घेत असलेल्या ७ नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. यानंतर जनरल वॉर्डमधील सुमारे ३० रुग्ण तसेच खासगी वॉर्डमधील १२ ते १५ रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. अशा प्रकारे एकूण सुमारे ५५ रुग्णांना रुग्णालयातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. इतर वॉर्डमध्ये आग पसरण्यापूर्वी नियंत्रणआगीचा भडका शेजारील वॉर्डमध्ये पसरण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच कारवाई केल्यामुळे आग इतर विभागात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली. जवानांनी पाण्याचा मारा करत अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
एनआयसीयूतील एसीमध्ये शॉर्टसर्किट
मध्यरात्री २.२७ वाजता एनआयसीयू विभागातील एसीमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाले. काही क्षणांतच एसीने पेट घेतला आणि संपूर्ण विभागात धुराचे लोट पसरले. धुरामुळे रुग्णांना गुदमरून जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात एकच पळापळ सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी तातडीने सिडको, पदमपुरा आणि एन-९ या अग्निशमन केंद्रांवरून पथके घटनास्थळी रवाना केली. अग्निशमन दलाच्या एकूण पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्याबरोबरच रुग्णांचे प्राण वाचवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले.