संसार म्हटले म्हणजे भांड्याला भांडे लागते असे म्हणतात. मात्र, कधी-कधी नवरा बायकोमधील भांडण टोकाचे रुप धारण करते आणि यानंतर रागाच्या भरात चुकीचे कृत्य घडते. असाच एक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला आहे. एका डॉक्टर दाम्पत्यामध्ये काही कारणांवरुन वाद झाला, यानंतर पत्नीने रागाच्या भरात स्वत:च्या घरालाच आग लावली.
छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील ठाकरे नगरमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टर दाम्पत्याचे रविवारी रात्री काही कारणावरुन भांडण झाले. यानंतर पत्नीचा राग अनावर झाल्याने तिने घरालाच आग लावली. थोड्याचवेळात आगीने रौद्र रुप धारण केले आणि सर्व घरात पसरली. त्यानंतर नवरा बायको दोन्हीही घरातून बाहेर पडले आणि तेथून निघून गेले.
परिसरातील लोकांना घराच्या खिडकीतून आगीचे लोट निघत असल्याचे दिसताच त्यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा, आग पसरुन संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी डॉक्टर दाम्पत्याचा बहुतांश संसार मात्र जळून खाक झाला आहे. मुकुंदवाडी पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.