

सुजित ताजणे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाच्या अनियमिततेमुळे आणि पाणीटंचाईमुळे शेती व्यवसायासमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. खरीप पिकांसह आता फळबागा वाचविण्याचेही मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभ्या केलेल्या डाळिंब, मोसंबी, संत्री, आंबा आणि द्राक्षांच्या बागा पाण्याअभावी सुकण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांपेक्षा कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन असलेल्या फळबागा वाचवण्याला शेतकरी प्राधान्य देत आहेत.
मराठवाड्यातील अनेक भागांत भूजलपातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्यावरही मर्यादा आल्या आहेत. काही ठिकाणी विहिरींचे पाणी कमी झाल्याने सिंचन करणे कठीण बनले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकरी ठिबक सिंचनाचा आधार घेत आहेत. मात्र, पाण्याचे स्रोतच आटत चालल्याने ठिबक सिंचन असूनही फळबागांना पुरेसे पाणी देणे शक्य होत नसल्याची परिस्थिती अनेक भागांत दिसून येत आहे.
फळबागा वाचविण्यासाठी आर्थिक कसरत
फळझाडे ही लहान रोपांपासून मोठी होऊन उत्पादन देण्याच्या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक वर्षे मेहनत घ्यावी लागते. खते, औषधे, मजुरी, छाटणी आणि सिंचनावर मोठा खर्च होतो. अशा परिस्थितीत दुष्काळामुळे बागा सुकल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखून ठेवायचे की फळबागांना द्यायचे, असा पेचही काही शेतकऱ्यांसमोर निर्माण होत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने काही शेतकरी टँकरद्वारे पाणी आणण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र, टँकरच्या पाण्यासाठी करावा लागणारा खर्च, इंधनाचे दर आणि सिंचनासाठी लागणारी मजुरी यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. दुसरीकडे, फळांना अपेक्षित आकार आणि गुणवत्ता मिळाली नाही, तर बाजारात कमी दर मिळण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
ठिबक सिंचन, आच्छादनाचा आधार
दुष्काळी परिस्थितीत फळबागांचे नुकसान कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, झाडांच्या बुंध्याभोवती आच्छादन करणे, तणांचे नियंत्रण आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन यांसारख्या उपाययोजनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. पाण्याची बचत करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करून प्रत्येक झाडाला आवश्यक तेवढे पाणी देण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत.मात्र, फळझाडांच्या प्रकारानुसार आणि त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज बदलते. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. फळबागांमध्ये पाण्याचा अनावश्यक वापर टाळतानाच झाडांना दीर्घकाळ पाण्याचा ताण बसणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
शासकीय मदतीची अपेक्षा
दुष्काळी परिस्थितीत फळबागा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासोबत आर्थिक मदतीचीही गरज आहे. पाणीटंचाईग्रस्त भागांत पाणीपुरवठ्याचे नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती, ठिबक सिंचनासाठी मदत आणि फळबागांच्या नुकसानीचे वेळेवर पंचनामे यांसारख्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.फळबागा ही केवळ एक हंगामी शेती नसून शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या परिश्रमातून उभी राहिलेली संपत्ती आहे. दुष्काळात ही संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, प्रभावी जलसंधारण आणि शासकीय यंत्रणेचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा, पाणीटंचाईमुळे फळबागांचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पुढील अनेक वर्षांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
फळबागांचे नुकसान दीर्घकालीन
वार्षिक पिकांच्या तुलनेत फळबागा उभ्या करण्यासाठी अधिक काळ आणि भांडवल लागते. झाडे वाळल्यानंतर नव्याने लागवड करून उत्पादन मिळेपर्यंत उत्पन्नात खंड पडतो. त्यामुळे मदत ठरविताना केवळ चालू हंगामातील फळांचे नुकसान नव्हे, तर झाडांचे नुकसान आणि पुनर्लागवडीचा खर्चही विचारात घेण्याची गरज आहे.संत्रा उत्पादक पट्ट्यांमध्येही झाडांना आवश्यक पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.
फळबागांचे नुकसान हे एका हंगामापुरते मर्यादित राहत नाही. झाडे वाळल्यास भविष्यातील उत्पादन, कुटुंबाचे उत्पन्न आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड या सर्वांवर परिणाम होतो. त्यामुळे दुष्काळी मदतीत फळबागांचे स्वतंत्र सर्वेक्षण, ठिबक सिंचनासाठी मदत, जलस्रोतांचे पुनर्भरण आणि बागाए वाचविण्यासाठी तातडीच्या उपाययोजना यांचा विचार करणे आवश्यक आहे.
- महेंद्र जहकार (शेतकरी )