छत्रपती संभाजीनगर : महापालिकेचा आरोग्य विभाग डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना राबवत असतानाही अनियमित पावसामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासक जी. श्रीकांत यांनी मंगळवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी डेंग्यू प्रतिबंधासाठी कोरोनाप्रमाणे ट्रेस, ट्रेक आणि ट्रीट आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
साधारणतः अनियमित पावसामुळे डेंग्यूची साथ वाढली आहे. या बैठकीत प्रशासकांनी सूचित केले की, अधिकचे डेंग्यू रुग्ण आढळणाऱ्या भागांवर फोकस करत उपाययोजना राबवा. अशा भागांत कोरोना काळात जशी ट्रेस, ट्रॅक आणि ट्रिट मोहीम राबवत उपाययोजना केल्या, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करा. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सर्वेक्षणाचे कामे करा. सर्व सर्वेक्षणाचे कामात उचतंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय वार्ड रचनेनुसार ब्लॉक तयार करून त्यांची जिओ फेंसिंग करावी तसेच प्रत्येक ब्लॉकमध्ये प्रत्येक कर्मचारीची मॅपिंग देखील करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या कामासाठी शहरात केवळ ५०० आशा वकर्स असल्याचे यावेळी समोर आले. त्यावर किमान अडीच हजार आशांची गरज असल्याचे मत प्रशासकांनी व्यक्त केले. जनजागृती, अॅबेट वाटप, औषध फवारणी, फॉगिंगचे वॉर्डनिहाय नियोजन करून मोहीम सुरू करा. डेंग्यूच्या प्रतिबंधासंबंधी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यासाठी पालिकेतील साथरोग निर्मूलन कक्षाचा वापर करा, अशा सूचना प्रशासकांनी केल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रजजित पाटील, शहर अभियंता ए.बी. देशमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शहरात आठवड्यातून एकदा नळांना पाणी येत असल्याने कोरडा दिवस कसा पाळावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत असल्याचे सांगितले. त्यावर जी. श्रीकांत यांनी पिण्याचे व वापराच्या पाण्याचे भांडे, टाक्या रिकाम्या करणे शक्य नसले तरी नागरिकांनी असे भांडे, टाक्या झाकून ठेवाव्यात, घर परिसरातील कुंड्या, पडलेले टायर, नारळ, साचलेले डबके हे रिकामे करण्याचे आवाहन करा, असे सूचित केले.
रिपोर्ट उशीरा दिल्यास लॅबवर कारवाई
डेंग्यू तपासणीच्या रिपोर्ट रोजच्या रोज मागवण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. डेंग्यूचे रिपोर्ट खासगी हॉस्पीटलसह दवाखान्यांना रोज नियमित पाठवण्याचे सूचित करावे. सर्व लॅबकडून नियमित रिपोर्ट यायला हवेत. उशिराने रिपोर्ट येत असल्यास किंवा माहिती लपवली जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित लॅबचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा देखील प्रशासकांनी यावेळी दिला.