उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी

Chhatrapati Sambhajinagar : शहरातील जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ प्रवेशद्वारा’च्या नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे.
उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी
उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी
Published on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जालना रोडवरील केम्ब्रिज चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) माध्यमातून सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या ‘राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ प्रवेशद्वारा’च्या नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. प्रवेशद्वारावर ‘संकल्पना’ म्हणून सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांचे नाव नमूद करण्यात आल्याने मराठा समाजातील नागरिकांसह विविध संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर राजकीय व्यक्तीचे नाव लिहिण्याची आवश्यकता काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. तसेच प्रवेशद्वारावरील पालकमंत्र्यांचे नाव तातडीने हटवावे, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. काही संघटनांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.

प्रवेशद्वाराच्या ठिकाणी स्वतंत्र शिलान्यास पट्टिका लावण्यात येणार असून त्यावर उद्घाटन करणारे मंत्री, प्रमुख पाहुणे, पीडब्ल्यूडी विभाग तसेच संबंधित ठेकेदाराची माहिती नमूद केली जाणार आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर स्वतंत्रपणे पालकमंत्र्यांचे नाव लिहिण्याची आवश्यकता नव्हती, असा आक्षेप डॉ. तुकाराम सराफ यांनी घेतला.

पीडब्ल्यूडीने कोणत्याही दबावाखाली काम करू नये आणि प्रवेशद्वारावरील नाव तातडीने हटवावे, अशी मागणी करत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या प्रवेशद्वाराच्या लोकार्पणापूर्वी कामाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी संभाजी सेनेचे शहराध्यक्ष राजू शिंदे यांनी केली. छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनीही नामफलकाला विरोध करत पीडब्ल्यूडीने जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली.

मराठा मावला संघटनेचे अध्यक्ष माणिकराव शिंदे यांनीही नामफलकामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा करत नाव हटवले नाही, तर उद्घाटनाला विरोध करण्याचा इशारा दिला. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला. त्यांना फोन तसेच संदेश पाठविण्यात आला; मात्र वृत्त प्रकाशित होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

प्रवेशद्वाराच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत असून प्रवेशद्वार पाहिल्यानंतर ते पाच कोटी रुपयांचे असल्याचे वाटत नाही. कामात गैरप्रकार झाल्याची शक्यता असून त्याची चौकशी करावी.प्रवेशद्वारावरील पालकमंत्र्यांचे नाव हटवावे, तसेच या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहे.

सुरेश वाकडे, प्रदेश सचिव, बुलंद छावा मराठा युवा परिषद

निधी माजी खासदाराचा, नाव मात्र पालकमंत्र्याचे

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पालकमंत्र्याचे नाव लिहिणे योग्य नसल्याचे सांगत ते तातडीने हटवण्याची मागणी केली. दरम्यान, प्रवेशद्वाराचे लोकार्पण १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे लोकार्पण होऊ शकले नाही. आता लोकार्पणाची तारीख निश्चित झालेली नाही. प्रवेशद्वारावर पालकमंत्री संजय शिरसाट यांचे नाव कधी आणि कोणाच्या निर्देशाने लिहिण्यात आले, याची माहिती नसल्याचे पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता एस. एल. भगत यांनी सांगितले. याबाबत माहिती घेऊन विभागीय स्तरावर बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in