
आज सकल हिंदू समाजाने छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनात जनगर्जना मोर्चा काढला. मात्र, पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. पण, तरीदेखील या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी हा मोर्चा शांततेच्या मार्गानेच होणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी मोर्चामध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध कर्णयांविरोधात घोषणाबाजी केली.
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने 'औरंगाबाद'चे 'छत्रपती संभाजीनगर' आणि 'उस्मानाबाद'चे 'धाराशिव' करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरून आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने 'जनगर्जना मोर्चा' काढला. यामध्ये आज भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली.
या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, "खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा." दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.