

छत्रपती संभाजीनगर : आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या मुलाला समजावण्यासाठी गेलेले वडील, आई आणि तो मुलगा हे तिघेही कड्यावरून कोसळून मरण पावल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.
कौटुंबिक वादातून संतप्त झालेला युवक खवल्या शहराच्या बाहेर असलेल्या पहाडाच्या धोकादायक कड्यावर जाऊन उभा राहिला. मुलाला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी तब्बल तीन तास जिवाची बाजी लावत त्याची समजूत काढली. पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकही घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, सर्वांच्या प्रयत्नांनंतरही दुपारी सुमारे एकच्या सुमारास युवक अचानक खोल खदानीत कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या आई-वडिलांचाही तोल गेला आणि तेही दरीत कोसळले. मोठ्या दगडांवर आदळल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने तिसगाव, देवळाई आणि सातारा परिसर हादरला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित युवकाचा कुटुंबीयांशी वाद झाला होता. त्यानंतर तो शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता खवल्या पहाडाच्या माथ्यावर गेला. काही वेळातच तो पहाडाच्या धोकादायक कड्यावर जाऊन उभा राहिल्याचे लक्षात आले.याची माहिती मिळताच कुटुंबीयांसह स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आणि अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले.
संवादाचे प्रयत्न... पण व्यर्थ!
या युवकाला आई हात जोडून मुलाला खाली येण्याची विनवणी करीत होती. वडीलही त्याच्याशी संवाद साधत त्याला सुरक्षित ठिकाणी येण्याचे आवाहन करीत होते. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही बचावाची तयारी केली होती. मात्र, युवक सतत आपली जागा बदलत असल्याने त्याच्याजवळ जाणे अत्यंत धोकादायक बनले होते.
…सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतरही युवक खाली येण्यास तयार नव्हता. अखेर दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अचानक त्याचा तोल गेला आणि तो खोल खदानीत कोसळला. मुलाला खाली पडताना पाहताच आई-वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, या प्रयत्नात त्यांचाही तोल गेला.
बचाव पथकाची धावपळघटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने खदानीत उतरून तिघांचा शोध सुरू केला. अवघड भूभाग, खोल दरी आणि मोठ्या दगडांमुळे मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाला मोठी कसरत करावी लागली.अथक प्रयत्नांनंतर तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ते शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
नेमका कौटुंबिक वाद कोणता? पोलिस तपास सुरूया घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी युवकाने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.