
छत्रपती संभाजीनगर : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. दरम्यान देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर ९० टक्के रुग्णांवर ३० दिवसात उपचार सुरू करण्यात आले आहेत. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले.
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे. ट्रू बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे.
पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज
राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये जवळपास दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतरित झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असून चालू वर्षात कर्करोगावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे लवकर निदान करण्यासोबतच निदान झाल्यावर ९० टक्के रुग्णांवर ३० दिवसांत उपचार सुरू करण्यात आले आहे. याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. २०१९ मध्ये ज्या जागेवर मी भूमिपुजन केले, त्याच जागेवर भव्य आणि अद्ययावत रुग्णालय उभे राहिले व माझ्या हस्ते उद्घाटन झाले, याचा विशेष आनंद असल्याचे नमूद केले. कर्करोग ही प्राधान्याची बाब ठरवून चालू वर्षात २०० डे केअर सेंटर्स उभारली जाणार आहेत. तसेच आरोग्य सुविधेचा घटक असणाऱ्या नर्सिंगबाबतही धोरण ठरविले असून देशात नवीन १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत केले जात आहेत. ७८० वैद्यकीय महाविद्यालये आज देशात आहेत. वैद्यकीय शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
- जे.पी.नड्डा, केंद्रीय आरोग्य मंत्री