

रायगड/मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती गुरुवारी राज्यभर अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी जमली होती. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईसह राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह थाटामाटात साजरा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ असलेल्या ठिकाणी शिवजयंती मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरी केली जात आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मुख्य इमारतीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता, असे नमूद करून फडणवीस म्हणाले की, “अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या अधिपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली.”
“राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रामार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगिजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रामार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले.
पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मराठा सेवा संघाच्या मागण्यांबाबत सकारात्मक
मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल. तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
शिवरायांच्या विचारांनुसार बलशाली महाराष्ट्र घडवू - शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडवू.”
शिवनेरी हे विचार आणि कार्याचे प्रेरणास्थळ - सुनेत्रा पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.
किल्ले रायगड विकास आराखडा व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ तुळापूर आणि समाधी स्थळ वढू बुद्रुक येथील स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहेत. या प्रत्येक स्मारकातून भावी पिढ्यांना प्रेरणा, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश मिळत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक घटकाची काळजी घेण्याची शिकवण आपल्याला दिली असून त्याच विचारांवर आणि रयतेचे राज्य या संकल्पनेवर राज्य सरकार पुढे वाटचाल करीत आहे. शिवछत्रपतींच्या स्वप्नातील सुजलाम सुफलाम, न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच यापुढेही महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
शिवजयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो शिवभक्त रात्रीपासूनच गडावर दाखल झाले होते. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, अंबरखान्याच्या खालच्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या अरूंद मार्गांवर भाविकांचा ओघ अचानक वाढला. रस्ते अरूंद असल्याने आणि एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक पुढे सरकल्याने तिथे प्रचंड ढकलाढकली सुरू झाली आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली. या चेंगराचेंगरीसदृश स्थितीत अनेक भाविक खाली पडले आणि जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उपस्थित पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने गडाखाली आणून रूग्णवाहिकेमार्फत जुन्नर आणि मंचर येथील शासकीय व उपजिल्हा ऊग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
४०० वी शिवजयंती जागतिक स्तरावर साजरी करणार - मुख्यमंत्री
“छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४००वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवनेरीवर दिली.
शिवनेरीवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती
शिवजयंतीनिमित्त गडावर दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांची मध्यरात्री प्रचंड गर्दी झाल्याने अंबरखाना परिसरातील अरूंद मार्गावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिक किरकोळ जखमी झाले, तर काहींना दुखापत झाली.
चेंगराचेंगरी झाली नसल्याचा पोलिसांचा दावा
गर्दी आवाक्याबाहेर जात होती, तेव्हा त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त किंवा प्रशासकीय यंत्रणा उपस्थित नव्हती, असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केला. दरम्यान, घटनेनंतर गडावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाकडून शिवभक्तांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले. गडावर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी असून, सायकल रॅली आणि पायी शिवज्योत घेऊन येणाऱ्या तरूणांचा ओघ दिवसभर सुरू होता. पोलिसांनी मात्र चेंगराचेंगरी झाली नाही, असा दावा केला आहे.