
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ शिवनेरी किल्ला, पुण्यातील लाल महाल येथे महाराजांचे बालपण गेले ते दिवस, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्या विजयाचे ऐतिहासिक ठिकाण प्रतापगड किल्ला आदी ठिकाणचा प्रेरणादायी पर्यटनस्थळाचा अनुभव प्रवाशांना घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला.
या रेल्वेतून सातशेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षांच्या आतील आहेत. जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिव राज्याभिषेकास ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. या गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे, तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शनही होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी उपस्थित होते.
पर्यटकांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत
रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडून पारंपरिक ढोल-ताशा यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली माहिती पत्रके वाटून माहिती देण्यात आली. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारित कार्यक्रम आयोजित केले आहेत.