९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : बहुढंगी साहित्य नगरी

बहुविध बाबींनी जशी भारतभूमी नटली आहे तशीच काहीशी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सजली होती.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : बहुढंगी साहित्य नगरी
Published on

बहुविध बाबींनी जशी भारतभूमी नटली आहे तशीच काहीशी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी सजली होती. संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ग्रंथनगरीतील प्रकाशन संस्थांच्या विविध दालनांना साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या. साहित्य संमेलनात महाराष्ट्रासह दिल्ली आणि देशभरातील विविध ठिकाणाहून साहित्यप्रेमी उपस्थित होते. शंभरहून अधिक दालने साहित्य संमलेनात उभारण्यात आले होते. महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या 'भूपाळी ते भैरवी' या कार्यक्रमास ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साहित्य नगरीत मुख्य सभामंडपात बहुभाषिक कविसंमेलन रंगले. त्यात कवींनी देशातील निरनिराळ्या भाषांतील प्रसिद्ध कवितांचे मराठी अनुवाद सादर केले.

पत्रकारांच्या पुस्तकांचे अभिनव प्रदर्शन

९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ग्रंथनगरीतील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन रसिकांचे विशेष आकर्षण ठरले. स्टॉल क्रमांक ९४ मध्ये पत्रकार संघाने प्रथमच महाराष्ट्राबाहेर आपल्या सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे अभिनव पद्धतीने प्रदर्शन भरवले. विविध क्षेत्रांतील घडामोडींचे दस्तावेजीकरण करणारे हे पुस्तकांचे संचित साहित्य संमेलनात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर सादर झाले असल्याने त्याची विशेष दखल घेतली गेली.

‘भूपाळी ते भैरवी' लोकसंस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांद्वारे लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या 'भूपाळी ते भैरवी' या कार्यक्रमास संमेलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडियममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपामध्ये हा लोककलेचा जागर झाला. साहित्य रसिकांनी या कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. परिसंवाद आणि इतर कार्यक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या मंडळींनी देखील या लोककलेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

अण्णाभाऊ साठेंचा चित्ररूपी प्रवास

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते आणि समाजमनावर अमिट छाप सोडणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास नेमका कसा होता? त्यांच्या वेगवेगळ्या वयातला त्यांचा चेहरामोहरा कसा असू शकतो? या विचाराने प्रेरित होऊन यूट्यूबर संजय कांबळे यांनी एआयच्या सहाय्याने अण्णाभाऊ साठेंचा चित्ररूपी प्रवास उलगडला.

बहुभाषिक कविसंमेलन

साहित्य नगरीत मुख्य सभामंडपात बहुभाषिक कविसंमेलन रंगले. त्यात कवींनी देशातील निरनिराळ्या भाषांतील प्रसिद्ध कवितांचे मराठी अनुवाद सादर केले. डॉ. अनुपमा उजगरे अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी पंजाबी कवी सुरजित पातर यांच्या कवितेसह आपली 'दुःख गोंजरायला मला उसंत नाही' ही कविता सादर केली. एकनाथ आव्हाड यांनी 'देऊळ' ही स्वतःची व कन्नड कवितेचा अनुवाद असलेली 'नवा भूगोलाचा धडा' ही कविता सादर केली. याशिवाय डॉ. मंजुषा कुलकर्णी, किरण गायकवाड, आसिफ जरियावाला, स्वाती सुरंगळीकर, गीतेश शिंदे, सुप्रिया घायतडक, सरोज आव्हाट, विष्णू सुरासे, डॉ. अनुश्री वर्तक, अमित भोळे आदींनी संस्कृतपासून मैथिली, बंगाली, उर्दू, कन्नड आदी विविध भाषांतील कवितांचे अनुवाद सादर केले, तर शुभदा फडणवीस यांनी सूत्रसंचालन केले.

logo
marathi.freepressjournal.in