छत्रपती शिवाजी महाराजांवरून तरुण भिडला भाजप आमदार अनिल बोंडेशी... काय आहे संपूर्ण प्रकरण ?

तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडील आहात, याचा अर्थ तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवाल असे नाही, असे तुषार उमाळेने खासदार अनिल बोंडे यांना सुनावले
छत्रपती शिवाजी महाराजांवरून तरुण भिडला भाजप आमदार अनिल बोंडेशी... काय आहे संपूर्ण प्रकरण ?
Published on

अमरावती येथे 19 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिवजयंती कार्यक्रमात एक विचित्र घटना घडली असून या कार्यक्रमात एका तरुणाची थेट भाजप खासदार अनिल बोंडे यांच्याशीच चकमक उडाली आहे. व्याख्यानादरम्यान खासदार अनिल बोंडे यांनी तरुणाच्या भाषणातील मुद्यांवर आक्षेप घेत संबंधित तरुणाला ‘तू मूर्ख आहेस का?’ असा सवाल केला. असे विचारले. यावर शिवव्याख्याता तरुण तुषार उमाळे यानेही खासदार अनिल बोंडे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. "तूम्ही मूर्ख आहात का?" असा सवाल तुषार उमाळे यांनी केला. शिवजयंतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवव्याख्याता तुषार उमाळे बोलत असताना त्याने आपल्या व्याख्यानात म्हटले की, शिवाजी महाराज कसे मुस्लिम विरोधी नव्हते यावर आपली भूमिका मांडली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अनिल बोंडे यांनी भाषणातील मुद्यांवर आक्षेप घेतला. "अरे शहाण्या.. तू मूर्ख आहेस का?" असे अनिल बोंडे यांनी विचारले.

यावर तुम्ही मूर्ख आहात का? असा प्रतिप्रश्न येताच अनिल बोंडे संतप्त झाले. शिवव्याख्याता  तुषार उमाळेच्या अंगावर बोंडे धावून आले. मात्र उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अनिल बोंडे परत आपल्या जागेवर गेल्यानंतर संबंधित तरुणाने अनिल बोंडे यांच्याशी व्यासपीठावरून संवाद साधला. “मी तुम्हाला घाबरत नाही. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी कदापि सहन केली जाणार नाही. आम्ही तुमचा सन्मान करतो. तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही वडील आहात, याचा अर्थ तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवाल असे नाही, असे तुषार उमाळेने खासदार अनिल बोंडे यांना सुनावले.

तुषार उमाळेने आपल्या भाषणात नेमके काय म्हटले? 

"शिवाजी महाराज कसे दाखवायचे ते आमच्या लोकांना कळत नाही. शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेषी होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. महाराजांना नाश्ता करायचा आहे… दोन मुसलमान कापून या… आता जेवणाची वेळ झाली… 12 वाजले… महाराजांनी चार मुसलमान कापले आणि आले… त्यांनी जाऊन चार मुसलमानांना मारले… मग जेवण झालं. संध्याकाळी पुन्हा सहा मुस्लिमांना जेवणापूर्वी कापण्यात आले. ते असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की ते झोपेतून उठले की मुसलमानांनाच मारतात, महाराजांना दुसरा काही उद्योग नव्हता. खरा मुद्दा असा आहे की महाराज कोणत्याही जातीधर्माला बांधील नव्हते. महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन सर्वांसाठी स्वराज्य निर्माण केले होते. मराठे लढायला गेले तेव्हा मावळ्यांनो, तुम्ही कोणत्या जातीचे आहात? हे विचारले नव्हते, असे तुषार उमाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in