

छत्रपती संभाजीनगर : हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे आणि हिंदुत्वच आम्हाला विकासाचे राजकारण शिकवते. ‘खान की बाण’ या प्रश्नावर उत्तर देताना ‘ना खान ना बान, राखू भगव्याची शान’ असे कणखर उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आगळावेगळा ‘टॉक शो’ आयोजित करण्यात आला होता. या ‘टॉक शो’चे शहरातील विविध ९० ठिकाणी थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर हे भारतातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जावे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
या कार्यक्रमात झालेल्या रॅपिड फायर प्रश्नावलीदरम्यान ते बोलत होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासात्मक मुद्द्यांवर भाष्य केले. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी या ‘टॉक शो’मध्ये सहभाग नोंदवला आणि आपली मते आणि प्रश्न मांडले. या कार्यक्रमास कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजय केणेकर, संघटन मंत्री संजय कोडगे, जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, उज्वला दहिफळे, छाया खाजेकर यांची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याचा विचार असून गरवारे स्टेडियमचा विकास केला जाणार आहे. देशाचे वीजेच्या वाहनांची राजधानी म्हणून संभाजीनगर पुढे येत असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
येत्या महानगरपालिका निवडणुकीत १५ तारखेला ‘कमळ’ या चिन्हाचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दोन महिन्यांत मुबलक पाणी मिळणार
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १ हजार कोटी रुपये आणि राज्य शासनाकडून १७०० कोटी रुपये असा एकूण २७०० कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प संभाजीनगरसाठी मंजूर केला. आज ३७०० अश्वशक्तीच्या मोटारीची टेस्टिंग यशस्वीपणे घेतली आहे. येत्या दोन महिन्यांत शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे.