"ऑनलाईन वाल्यांना लाईनवर आणलं", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर शेलक्या भाषेत टीका

राजकारण करणाऱ्यांना ते करु द्या. आपण आपलं काम करुया, राज्याचा विकास करुया. या राज्याला पुढे नेऊया, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.
"ऑनलाईन वाल्यांना लाईनवर आणलं", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर शेलक्या भाषेत टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज परभणी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. काही लोक घरात बसून राज्यकारभार हाकायचे. मात्र, आम्ही त्यांना एक करंट दिला आणि ते ऑनलाईनवरुन लाईनवर आले, असं म्हणत शिंदे यांनी ठाकरे यांना टोला लगावला. तसंच तु्म्ही सकाळी कितीही भोंगे लावा आम्ही आमचे काम करत राहणार. आम्ही आमच्या कामातून तुम्हाला उत्तर देणार,असं देखील ते यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, इतर देशातील प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतात. हा तमाम देशवासियांचा गौरव आहे. राजकारण करणाऱ्यांना ते करु द्या. आपण आपलं काम करुया, राज्याचा विकास करुया. या राज्याला पुढे नेऊया. यासाठी केंद्राचं पाठबळ आपल्याला मिळत आहे. केंद्र सरकारकड़ून आपल्या योजनांना संन्मती मिळत आहे. समुद्रात वाया जाणारे पाणी अडवून आपल्याला मोठे प्रकल्प करायचे आहेत. केंद्राचा या प्रकल्पांना भक्कम पाठिंबा मिळणार आहे, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in