मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र राज्यातचं असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ANI

मंगळवारी दसरा मेळाव्याची लगबग झाल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे विमानतळावरुन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र राज्यातचं असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर का गेले याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. या दौऱ्याचं मूळ कारण अद्याप समोर आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आमदार अपात्रतेची कारवाई, रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, महामंडळ वाटप आणि सगळ्यात महत्वाचं मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा. या पार्श्वभूमीर मुख्यमंत्र्यांचा आजचा दिल्ली दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेलया मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकाला दिलेला ४० दिवसांचा वेळ आता संपला असून आजपासून त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा करुन आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यामुळे मराठा आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार का? याकडे आता राज्याच्या जनतेचं लक्ष लागलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in