File Photo
File PhotoANI

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत ; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी चर्चा

गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला पोहोचले आहेत. राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदेंची ही दिल्लीवारी असल्याचे समजते. त्याचसोबत महाराष्ट्रातील विविध मोठे प्रकल्प देखील मार्गी लावायचे आहेत. त्यासंदर्भातही मुख्यमंत्री भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी सल्लामसलत करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीला जाणार असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याने राज्यात लवकरच मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी संध्याकाळी उशिरा दिल्लीला पोहोचले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेणार असल्याचे समजते. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. अद्यापही मंत्रिमंडळात एकही राज्यमंत्री नाही. त्यामुळे सत्ताधारी शिंदे गट तसेच भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करण्यासाठीच मुख्यमंत्री दिल्लीत आले असल्याचे समजते.

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत नेमके कोणाला भेटून चर्चा करतात याकडे लक्ष लागले आहे.

मोठ्या प्रकल्पांना केंद्राचे बळ हवे

महाराष्ट्रातील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. त्याचसोबत काही मोठे प्रकल्प सुरू करायचे आहेत. त्यासंदर्भात केंद्राचे मोठे पाठबळ लागणार आहे. लोकसभा निवडणुकांना आता वर्षभरापेक्षा कमी कालावधी आहे. त्या आधीच महाराष्ट्रासाठी मोठे प्रकल्प मंजूर करून घेण्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. दिल्लीवारीत या प्रकल्पासंदर्भातही चर्चा होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in