गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना पुढे केले! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्याचा आरोप

आपल्यावरील गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना पुढे करून मराठा आरक्षण आंदोलन चिघळवल्याचा खळबळजनक आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.
गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना पुढे केले! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्याचा आरोप
@laxman.hake/Facebook

बुलढाणा : आपल्यावरील गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगेंना पुढे करून मराठा आरक्षण आंदोलन चिघळवल्याचा खळबळजनक आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मराठा समाजाला देण्याचा शिदेंचा डाव असल्याचाही आरोप त्यांनी केला. वाघमारे यांच्या या आरोपामुळे आरक्षणाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

‘ओबीसी आरक्षण बचाव’ आंदोलन करणारे लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे बुधवारी सिंदखेडराजाच्या दौऱ्यावर आले होते. तेथे त्यांनी राजमाता जिजाऊंचे दर्शन घेतल्यानंतर एक सभा घेतली. यावेळी नवनाथ वाघमारे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच लक्ष्य केले. ते म्हणाले की, शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंवर गद्दारीचा शिक्का लागला. हा शिक्का पुसण्यासाठी त्यांनी मनोज जरांगे यांना पुढे केले आहे. त्यांना आमच्या हक्काचे आरक्षण मराठा समाजाला द्यायचे आहे.

..तर आम्हीही निवडणूक लढवू

आम्ही ओबीसी समुदायाच्या व्यथा व गाऱ्हाणे सरकारपुढे मांडत आहोत. जर सरकारने आम्हाला न्याय दिला नाही, तर आम्हीही निवडणूक लढवून जनतेच्या न्यायालयात दाद मागू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला दिला.

बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करा

आतापर्यंत मराठा समाजाचा आमच्यावर दबाव होता, पण आता ओबीसी रस्त्यावर उतरले असून, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे, ही आमची प्रमुख मागणी आहे, असे नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. कुणबी व मराठे वेगवेगळे असल्याचा पुनरुच्चार यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला. ओबीसींची एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न असून, कुणबी हे मूळचे ओबीसीमध्येच आहेत. त्यामुळे कुणबी व मराठा एक होऊच शकत नाही. कुणबी व मराठा वेगवेगळे आहेत. सुप्रीम कोर्टानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतरही मराठा समाज कुणबींच्या अधिकारावर आपला हक्क सांगत आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in