मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना ; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेणार भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना ; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. ते दिल्लीत पोहचले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या खासदारांना संधी मिळण्याबाबत ते अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गट आणि भाजप यांनी सरकार स्थापन केल्यापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असून अपक्षांसह अनेकांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर वेगवेगळी वक्तव्य येत असताना तसंच यावर चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याने या भेटीत काय निष्पन्न होत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथे होते. विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पाडून त्यांनी थेट दिल्ली गाठली. शिंदे हे आज रात्री उशिरा शाह यांची भेट घेणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार रखडलेल्या मंत्रिमंडाळाच्या विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. शिंदे गटाकडून कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल? केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल? या स्वरुपाच्या चर्चा या भेटीत होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची काल उशिरापर्यंत महत्वाची बैठक पार पडली. भाजपमध्ये संघटनात्मक तसंच केंद्र सरकारमध्ये देखील मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा विस्तार होण्याची देखील शक्यता आहे. त्याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्याचं सांगितलं जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in