मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून सुद्धा विजय शिवतारे यांचे शेपूट सरळ न झाल्याने त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. यामुळे आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादीने येथून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुरंदर तालुक्यातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना विरोध करत बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने आता शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली आहे. विजय शिवतारे यांचे व्यक्तिगत आयुष्य आणि बाबी खालच्या स्तराच्या आहेत. या बाबी चव्हाट्यावर आल्यामुळे विजय शिवतारे यांचे व्यक्तिमत्त्व काय आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर आले आहे. त्यामुळे त्यांना इतरांची लायकी तपासण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.