अतिवृष्टी बाधितांना आवश्यक ते सहाय्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी, पीक परिस्थिती, विकासकामे तसेच इतर विविध बाबींसंदर्भात विभागीय आढावा बैठक घेतली
अतिवृष्टी बाधितांना आवश्यक ते सहाय्य करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Published on

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येकाला आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिले. तसेच औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या योजनेच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींचा निधी देण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी, पीक परिस्थिती, विकासकामे तसेच इतर विविध बाबींसंदर्भात विभागीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाणी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, अतुल सावे, माजी मंत्री रामदास कदम तसेच सर्व अधकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निकषानुसार मदत देण्यासह नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा शासनाचा विचार असल्याचे सांगितले. बाधितांना नियमानुसार देय असलेली आर्थिक मदत, इतर सहाय्य तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शेतकरी हिताला शासनाचे प्राधान्य असून शेती आणि शेतकरी विकासाच्या विविध योजना अधिक गतिमानतेने लोकांपर्यंत पोहचवाव्यात. शेतीव्यतिरिक्त अर्थाजनाच्या विविध स्त्रोतांची उपलब्धता करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. तसेच पारंपरिक शेतीसोबतच सेंद्रीय शेती, क्लस्टर शेती या संकल्पना तसेच इतर राज्यांमध्ये, देशांमध्ये आधुनिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करण्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. खाजगी सावकारीला आळा घालण्यासह बँकांकडून कर्ज प्रस्ताव वेळेत मंजूर व्हावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत असे आदेश देतानाच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सर्व शासकीय योजनांचे लाभ देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. नांदेड-जालना समृद्धी महामार्ग लवकरच बांधण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in