मुंबईपाठोपाठ मराठवाड्यासाठी भाजप आग्रही

राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील बहुतांशी आमदार, नेते भाजपसोबत गेल्याने जागावाटपातील गुंता वाढत चालला आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस गुंता वाढत चालल्याचे चित्र आहे.
मुंबईपाठोपाठ मराठवाड्यासाठी भाजप आग्रही
Published on

विशेष प्रतिनिधी/ मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद मुंबईसह मराठवाड्यातही चांगली आहे. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमधील तब्बल ५ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यातील दोन मंत्री आहेत. मात्र, असे असतानाही छत्रपती संभाजीनगरमधील जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यांची हिंगोली, धाराशिवमध्येही मोठी ताकद आहे. त्यातल्या त्यात हिंगोलीत तर शिंदे गटाचे हेमंत पाटील विद्यमान खासदार आहेत. परंतु या ठिकाणीही शिंदे यांच्या गटाला जागा मिळण्याची खात्री नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंबईनंतर मराठवाड्यातही शिंदे सेना बॅकफूटवर येण्याची शक्यता आहे.

राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील बहुतांशी आमदार, नेते भाजपसोबत गेल्याने जागावाटपातील गुंता वाढत चालला आहे. आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस गुंता वाढत चालल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत मोठी ताकद आहे. कारण शिवसेनेचे बरेच आमदार आणि नगरसेवक थेट शिंदे गटात दाखल झाले आहेत. तसेच विद्यमान खासदारही सोबत आहेत. मात्र, मुंबईत दक्षिण-मध्य मुंबईची राखीव जागा वगळता अन्य जागा देण्यास भाजपचा विरोध आहे. त्यामुळे मुंबईत भाजप ५ जागांवर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेवर शिवसेनेचाच दावा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गटाला फार तर ही जागा मिळू शकते. परंतु अन्य चार जागांवर भाजपचाच दावा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबईतून बस्तान उठविण्याचाच प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना मुंबईत बॅकफूटवर आल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

यासोबतच शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातही फार मोठी ताकद आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, धाराशिव, जालन्यात शिंदे गटाला चांगले पाठबळ मिळाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि धाराशिवच्या जागेवर त्यांनी दावा सांगितला आहे. त्यांच्या पक्षाची ताकद पाहता महायुतीत त्यांना या जागा मिळाल्या पाहिजेत. परंतु छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली आणि धाराशिवच्याही जागेवर भाजपनेच दावा सांगितला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यातही बॅकफूटवर येण्याचीच वेळ आली आहे. त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तडजोड करून पुढे जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे. याचा फटका ऐन निवडणुकीत बसू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला हवी

छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यात ५ आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यापैकी दोन मंत्री आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या गटाची ताकद खूप मोठी असून, या मतदारसंघात सातत्याने शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे. केवळ २०१९ मध्येच मतविभाजनामुळे एमआयएमला संधी मिळाली. आता येथे ठाकरे गटाकडून पुन्हा चंद्रकांत खैरे हेच मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु भाजपने या जागेवर दावा सांगत त्यांचा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड किंवा अतुल सावे यांना मैदानात उतरविण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in