मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी ; महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३४ वरुन ३८ टक्के होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिली एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी ; महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

गणेशोत्सवाच्या आधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ३४ वरुन ३८ टक्के होणार आहे. ९० हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाकडून अर्थसहाय्य दिलं जातं. त्यामुळे महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाल्याने सरकारवर ९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसंच असुधारित वेतन संरचनेतील राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना २०३ टक्क्यांवरुन वाढवून २१२ टक्के महागाई भत्ता देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, असं आश्वासन दिलं होतं. यावर अंबलबजावणी होत नसल्याने एसटी कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाची फाईल मंत्रालयात धुळ खात पडली असल्याचा आरोप केला होता.

logo
marathi.freepressjournal.in