भाजपमुळे देशाची जगभर नाचक्की ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद सभेत घणाघात

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघालाही त्यांनी धारेवर धरले. मुख्यमंत्री म्हणाले की, “हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालते?
भाजपमुळे देशाची जगभर नाचक्की ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद सभेत घणाघात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद - भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे देशाची जगभर नाचक्की झाली आहे. त्यामुळे सरकारला माफी मागावी लागली, हे दुर्दैवी असून देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला जातो, हे योग्य वाटते का? ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, अशा शब्दांत मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथील सभेत भाजपवर घणाघात केला.

मुंबईत झालेल्या सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानावर बुधवारी झालेल्या जाहीर सभेतही भाजपसह संघावर जोरदार टीका केली. “औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? असे भाजप ओरडतेय; पण संभाजीनगर हे वडिलांनी दिलेले वचन आहे, ते मी विसरलो नाही आणि विसरणारही नाही. जवळपास दीड वर्षापूर्वी औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलावे, असा ठराव आम्ही केंद्राकडे दिला आहे, त्याचे काय झाले? मी आत्ताही शहराचे नाव बदलू शकतो; मात्र नाव बदलले आणि औरंगाबादचा पाणीप्रश्न आणि इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील,” असे उद्धव यांनी सांगितले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघालाही त्यांनी धारेवर धरले. मुख्यमंत्री म्हणाले की, “हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालते? भाजप ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली. काश्मिरी पंडितांनी घर सोडले. त्यांचा गुन्हा काय? घरात जाऊन गोळ्या घालतात, शाळेत जाऊन गोळ्या घालतात. हिंमत असेल, तर काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा. मर्द असाल, तर काश्मिरी पंडितांची रक्षा करा.”

राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. “कोर्टातून आदेश आला म्हणून राम मंदिर झाले. तुमचे कर्तृत्व काय? आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपने त्यांच्या बेलगाम प्रवक्त्यांच्या डोक्यात अक्कल घातली पाहिजे. कदाचित उद्या आमचा संयम सुटला तर तुमच्याच शब्दांत आमचे नेते टीका केल्याशिवाय राहणार नाहीत. हा जो भगवा आहे, तो नुसता फडकावण्यासाठी नाही. हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा भगवा आहे. ते विचार आणि संस्कार आमच्या धमण्यात भिनणार नसतील, तर उपयोग नाही. इकडे हनुमान चालिसा म्हणायची आणि दुसरीकडे शिव्या देणे हिंदुत्व नाही,” असा घणाघातही त्यांनी भाजपवर चढवला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका

मागे कुणीतरी औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढला होता. तो जनतेसाठी आक्रोश मोर्चा नव्हताच. सत्ता गेली म्हणून केलेला आक्रोश होता. आमच्या पूर्वी तुमचीच सत्ता होती. मग का नाही सोडवला पाण्याचा प्रश्न, असा प्रश्न विचारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.

औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवणार

पूर्वी आठ-दहा दिवसांनी औरंगाबादमध्ये पाणी यायचे. संभाजीनगरच्या समांतर योजनेला एकही पैसा कमी पडू देणार नाही, असा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. औरंगाबादसाठी पाणी द्या, असा मी अधिकाऱ्यांना ठणकावले आहे. समांतर योजनेचा पाठपुरावा मी करणार हे औरंगाबादकरांना वचन दिले आहे. कंत्राटदाराने हयगय केल्यास त्यांना तुरुंगात टाका, असे आदेशही मी प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in