मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून रंगल्या होत्या. त्याबाबत बोलताना, 'मी मिलिंद नार्वेकर यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. यासोबतच मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विकासाला महत्त्व दिले आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंचे कौतुक करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती का?, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत माझा संपर्क नाही. मी त्यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. नार्वेकर आता उबाठामध्ये आहेत, ते तिकडेच सुखी राहू देत, त्यांना माझ्या शुभेच्छा", अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांनी सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.
पाठिंबा काय घरी बसलेल्यांना देतात का?
"राज ठाकरेंना धन्यवाद दिले पाहिजे की, त्यांनी विकासाला महत्त्व दिले आहे. मोदीजी देशाचा विकास करत आहेत. काँग्रेसने देशाला ५०-६० वर्षात खड्ड्यात घातले होते. आता मोदीजी देशाला पुढे नेत आहेत. राज्यात आम्ही काम करत आहोत. राज ठाकरे देखील माझ्याकडे लोकांची कामे घेऊन आलेत आणि एक पक्ष म्हणून सत्तेत नसला तरी, राज ठाकरेंची भावना आहे की, लोकांची कामे झाली पाहिजे. सरकारकडून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. त्या भावनेने राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला आहे, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा पाठिंब्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. त्यासोबतच, पाठिंबा काय घरी बसलेल्यांना देतात का? फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना आणि फक्त शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे का? असा उलट सवाल करत नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणाही साधला.
मनसेने पाठिंबा देताना कोणत्याही अटी-शर्ती ठेवल्या नाहीत
मनसेने पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात त्यांना आगामी काळात काही देणार आहात का? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, पुढे विधानसभा आणि महापालिका निवडणुका आहेत. मनसेने आम्हाला पाठिंबा देताना आमच्या पुढे कोणत्याही अटी-शर्ती ठेवल्या नाहीत. लोकसभेत मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि राज्यात महायुतीला जास्त जागा मिळाव्यात, अशी राज ठाकरेंची भावना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज ठाकरे हे कद्रू वृत्तीचे नाहीत
महायुतीचे नेते आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र कधी दिसणार? या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "राज ठाकरे यांच्या स्वतंत्र सभा होतील आणि एकत्र सभा देखील होतील. राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस आहे. राज ठाकरे हे कद्रू वृत्तीचे नाहीत", असे मुख्यमंत्री म्हणाले.