प्रतिनिधी/मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता लोकसभेच्या मैदानात उतरले असून राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचे दौरे ते सुरू करणार आहेत. येत्या ६ जानेवारीपासून त्याची सुरुवात होणार आहे. पुण्यातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल. ६ जानेवारी रोजी मावळ आणि शिरूर मतदारसंघांना ते भेट देतील. या दौऱ्यांना जनतेने उदंड असा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातल्या विविध लोकसभा मतदारसंघांच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जाहीर झालेला आहे. स्व. मीनाताई ठाकरे यांना आदरांजली वाहून ६ जानेवारीला त्याची सुरुवात होते आहे. ६ जानेवारीला मावळ आणि शिरूर या दोन ठिकाणी ८ तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तसेच १० जानेवारी हिंगोली अशा प्रकारे विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरे होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी नगरविकास मंत्री,आरोग्य मंत्री म्हणून काम केले आहे. तसेच गेल्या दीड वर्षात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य घेऊन ते राज्यातील जनतेसमोर जाणार आहेत. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी 'शासन आपल्या दारी'सारखी योजना त्यांनी राबविली. दुष्काळ असो वा पूर, त्यांनी मदतीसाठी कायम हात पुढे केला. इर्शाळवाडीसारख्या दुर्गम ठिकाणी ते स्वत: आधी पोहोचले. आरोग्याच्या क्षेत्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून त्यांनी मोठे कार्य केले आहे. वैयक्तिक पातळीवर देखील त्यांनी गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका जिंकणे हे भाजप तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी महत्त्वाचे असणार आहे. महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचार करणार आहेत. लोकसभा मतदारसंघनिहाय दौरे हे याचीच सुरुवात असेल. या दौऱ्यांना जनतेने प्रचंड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.