मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात : आम्ही हिंदुत्व कधीच सोडले नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात : आम्ही हिंदुत्व कधीच सोडले नाही

कोल्हापूर : “भाजप नेहमी भगव्याचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरल्याचे सांगत असते. मात्र, कोणता भगवा. खरा भगवा तर शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून देशात दुसरा हिंदूहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र हिंदूहृदयसम्राट म्हटले की, फक्त बाळासाहेब ठाकरेच आठवतात. भाजपचा हिंदूहृदयसम्राट हा नकली आहे,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी व्हर्च्युअल सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले की, ‘‘भारतीय जनता पार्टीने एक बनावट ‘हिंदूहृदयसम्राट’ बनवण्याचा प्रयत्न केला; परंतु लोकांनी त्यांना झिडकारले. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही. युती आम्ही नव्हे भाजपने तोडली, अमित शाह यांनी वचन मोडलं,” याचाही उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केला.

‘ईडी’च्या धाडसत्रावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ‘‘ही एक निवडणूक आहे म्हणून ठीक आहे. राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या, तर आपल्या समोरासमोर लढणारा कोणीही मर्द नाही. कुस्तीमध्ये भाजप उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावर सीबीआय, ईडीच्या धाडी टाकेल. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. काल कुणीतरी सभा घेतली. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी मीही सभा घेतलेली नाही. बोलायला काही मुद्दे नसले की, आरोप केले जातात. एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काही घोडे पुढे सरकते का, हे बघायचं. त्यांची ही वाईट सवय आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचे सांगण्यासारखे काही नाही. म्हणून द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपलं ईप्सित साध्य करायचं, हेच या देशात सुरू आहे.

मोदी पंतप्रधान आहेत की सरपंच? उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले, ‘‘शिवसेना स्थापन झाल्यापासून शिवसेनेने कधीही झेंडा, रंग, विचार, नेता बदलला नाही. तुम्ही मात्र लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यांना विसरले. कुठेही त्यांचा फोटो दिसत नाही. फक्त नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतो. लोकसभेची निवडणूक असो किंवा सरपंचपदाची प्रत्येक ठिकाणी नरेंद्र मोदींचाच चेहरा दिसतो. मोदी हे पंतप्रधान आहेत की गावचे सरपंच,”

असा टोला ठाकरे यांनी केंद्र सरकारला हाणला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in