राज्यभरात ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार- मुख्यमंत्री

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही
राज्यभरात ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार- मुख्यमंत्री
Published on

राज्यभरात सुमारे ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत २२७ ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी ५० दवाखाने २ ऑक्टोबरपासून सुरू देखील झाले आहेत. राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे आणि बाल आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटाने शिवसेना आपलीच असा दावा केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हीच पुढे घेऊन जात असल्याचे शिंदे गटातील नेत्यांचे म्हणणे आहे. शिंदे गटाकडून दसरा मेळावा देखील आता आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजनेला महत्व आहे. मुंबईत देखील असे २२७ दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. म्हणजेच मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात एक दवाखाना सुरू होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना जर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

logo
marathi.freepressjournal.in