मुंबई : एसटीची नवीन भाडेवाढ शनिवारपासून लागू झाली आहे. भाडेवाढ होताच बस वाहकांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. एसटीचा बहुतांश प्रवासीवर्ग हा ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ऑनलाईन पैशाचा व्यवहार करायला अडचणी येत असल्याने सुट्ट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशी यांच्यातील खटके नित्यनेमाचे झाले आहेत. आता सर्वाधिक वेळेला वाद होण्याची शक्यता असल्याने भाडेवाढीत दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८(२) तरतुदीनुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. एसटी प्रवासी भाड्यात १४.९५ टक्के इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला होता. या प्रस्तावाला प्राधिकरणाने मंजुरी दिली असून नवीन भाडेवाढ शनिवारपासून लागू झाली आहे.
नव्या भाडेवाढीनुसार फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१ आणि हाफ तिकीट ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६,४१, ४६, ५१, ५६ असे झाले आहे. पूर्वी भाडे पाच रुपयांच्या पटीत होते. ते नवीन भाडेवाढीमध्ये अधिक एक रुपयांच्या पटीत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना अतिरिक्त एक रुपया खिशात ठेवावा लागणार आहे. प्रवाशांनी १०, १५, २५, ५० रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास वाहक आणि प्रवाशांमध्ये एक रुपयांवरून खटके उडण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तत्काळ बदल करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात समप्रमाणाच्या पटीत भाडेवाढ करण्यात आली होती. त्यामुळे कुठेही वाद होताना दिसले नाहीत, असा दावा श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
भाडेवाढ समप्रमाणात करण्याऐवजी विषम प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे प्राधिकरणाची पुन्हा एकदा बैठक घेऊन भाडेवाढीत दुरुस्ती करण्यात येऊन समप्रमाणात भाडेवाढ करण्यात यावी, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.