Chinchwad By Election : चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय; बंडखोरीचा अजित पवारांना फटका

चिंचवड मतदारसंघामध्ये (Chinchwad By Election) राहुल कलाटे यांनी केलेल्या बंडखोरीचा फटका मविआचे उमेदवार नाना काटे यांना बसला
Chinchwad By Election : चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय; बंडखोरीचा अजित पवारांना फटका
Published on

चिंचवड मतदारसंघात (Chinchwad By Election) भाजपचे (BJP) दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा तब्बल ३६ हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार नाना काटे (Nana Kate) यांचा दारुण पराभव केला. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) या मतदारसंघासाठी जात लावून धरला होता. मात्र, महाविकास आघाडीचे नेते राहुल कलाटे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली आणि याचा फटका नाना काटेंना बसला. दरम्यान, निवडून आलेल्या अश्विनी जगताप यांनी, कुठलाही जल्लोष करणार नसून सर्वात आधी लक्ष्मण जगताप यांच्या समाधीला भेट देणार असल्याचे सांगितले.

निवडून आलेल्या अश्विनी जगताप यांनी विजयानंतर, "२ महिन्यांपूर्वी मी आमदार होईल, असा विचारही केला नव्हता. तेंव्हा लक्ष्मण जगताप साहेब माझ्या सोबत होते. मात्र आज ते आपल्यात नाहीत. त्यांची उणीव कायम जाणवेल," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान, कसबा पेठप्रमाणे चिंचवडमध्येही महाविकास आघाडीचे पारडे जड वाटत होते. मात्र, बंडखोर राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सर्व समीकरणे बदलली.

भाजपकडून उभ्या राहिलेल्या अश्विनी जगताप यांना १,३५, ४९४ मते पडली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार नान काटे यांना ९९,४२४ मते पडली. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागलेले बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४०,०७५ मते पडली. या जागेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी ताकद लावली होती. तर नाना काटेंच्या पराभवामुळे अजित पवारांच्या वर्चस्वाला नक्कीच धक्का बसला आहे. दरम्यान चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले होते. नाना काटे तसेच अजित पवारांनीदेखील 'बंडखोरीचा फटका या निकालावर बसला.' असा भावना व्यक्त केल्या.

logo
marathi.freepressjournal.in