चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देणार; पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा
सिंधुदुर्ग : कोकणच्या विकासाचे स्वप्न पाहणारे थोर संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव चिपी विमानतळाला देण्यात येणार असून, पुढील जयंतीपूर्वी हे नामकरण केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्राच्या वतीने कै. नाथ पै यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री राणे यांनी कै. नाथ पै यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलवून, त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून बॅ. नाथ पै यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडा सादर केला होता. कोकण रेल्वेचे स्वप्न सुद्धा त्यांचेच होते आणि त्यांनी ही मागणी अधिवेशनात आग्रहाने लावून धरली होती.
बॅ. नाथ पै यांनी कोकण विकास परिषदेच्या रूपाने एक सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण करून कोकणच्या विकासासाठी कोकणी माणसाला एकत्र आणण्याचे काम केले. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे तरुण आज काम करत आहेत, असे राणे म्हणाले. नाथ पै जेव्हा संसदेत भाषण करायला उभे राहतात, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे भाषण ऐकण्यासाठी सभागृहात आवर्जून उपस्थित राहत असत, अशा शब्दांत त्यांनी नाथ पै यांच्या मोठेपणाचा गौरव केला.
सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन
राणे यांनी यावेळी कोकणच्या विकासावर भर दिला. कोकणच्या विकासाबाबत तडजोड नाही. जेव्हा केव्हा कोकणच्या विकासाचा विषय येईल, त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम करायला हवे, ही संकल्पना नाथ पै यांनी त्यावेळी मांडली होती. खासदार नारायण राणे, मी स्वतः (पालकमंत्री), आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे हे सर्वजण आपापल्या परीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहोत. त्यामुळे कोकणच्या विकासासाठी जो कोणी काम करत असेल, त्याला साथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहनही त्यांनी केले.