मुंबई-अयोध्या रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा - मुख्यमंत्री

जालना- मुंबई वंदे भारतचे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत केले स्वागत
मुंबई-अयोध्या रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा - मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईहून अयोध्या अशी रेल्वे सुरू व्हावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आजपासून सुरू झालेली जालना- मुंबई ही वंदे भारत रेल्वे छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात आली. या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानकात उपस्थित होते. त्यांच्यासमवेत खासदार राहुल शेवाळे देखील होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी प्रारंभी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते अयोध्या रेल्वे देखील सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाला केली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. राज्यात रेल्वेने १ लाख ७ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी एकदा ठरवलं की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीनं पूर्ण होतोच, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रवाशांची उत्स्फूर्त दाद

जालना-मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले. प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वे कोचमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले. या रेल्वेमुळे आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपूर अशा सात ट्रेन्स धावतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in