हिंगोली : कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संयोजक अभिजीत दीपके यांनी शनिवारी हिंगोली जिल्ह्यातील मूळ गावातून 'स्कूल ठीक करो' अर्थात 'शाळा ठीक करा' मोहिमेचा शुभारंभ केला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी सरकारी शाळांमधील दुरवस्थेवरून सरकारवर जोरदार टीका केली, तसेच खासगी शाळांच्या फीवर मर्यादा आणण्याची मागणी केली.
दीपके यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त संतूक पिंपरी या आपल्या मूळ गावी भेट देऊन तेथील ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली. यानंतर त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली असता, तेथील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा पुरवठाच नसल्याचे निदर्शनास आले.
दीपके यांनी पत्रकारांना सांगितले की, स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत आली तरी सरकारी शाळांमध्ये पाण्यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसतील, तर देश कसा विकसित होणार, पाणी नसल्यास विद्यार्थ्यांनी शौचालयासाठी घरी जायचे का, असा सवाल त्यांनी केला. शाळेत पुरेशा बाकांची सोय नाही. विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना केवळ चारच बाकेच उपलब्ध आहेत. खासगी शाळांमध्ये बाके असतात, मग सरकारी शाळांमध्ये का नाहीत, असे ते म्हणाले.
गेल्या १० वर्षांत देशातील ९४,००० हून अधिक सरकारी शाळा बंद पडल्याचा दावा करत दीपके यांनी केंद्र सरकारवर शिक्षणाचा अर्थसंकल्प कमी केल्याचा आरोप केला. नवीन शाळा सुरू करण्याची गरज असताना सरकारी शाळा बंद करून खासगी शाळांचे भले केले जात आहे, असे ते म्हणाले.
आरोग्याबाबतही आंदोलन
सरकारी शाळांनंतर कॉकरोच जनता पार्टी सार्वजनिक रुग्णालयांच्या दुरवस्थेविरोधातही चळवळ उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. शस्त्रक्रियेसाठी आणि सीटी स्कॅनसारख्या चाचण्यांसाठी आठवडाभर वाट पहावी लागते. याविरोधात आम्ही लवकरच आवाज उठवणार आहोत, असे ते म्हणाले.
शाळांच्या शुल्कावर नियंत्रण
पालकांना खासगी शाळांमध्ये १ ते १.५ लाख रुपये फी भरावी लागत असून, यामुळे गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे खासगी शाळांच्या फीवर तातडीने मर्यादा आणली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्याचप्रमाणे, छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या तिरंगा रॅलीदरम्यान लावण्यात आलेल्या मोठ्या बॅनरच्या निधीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामीण भागातील तरुण देशाचे राजकारण ठरवतील, असा विश्वास व्यक्त करत दीपके यांनी नागरिकांना आणि सरपंचांना शाळांचे 'सोशल ऑडिट' करण्याचे आवाहन केले.
खिडक्यांना शिंदेंचे बॅनर
शाळेच्या असमाधानकारक परिस्थितीवर बोट ठेवत त्यांनी सांगितले की, शाळेच्या खिडकीच्या काचा तुटलेल्या असून तेथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. ही आपल्या देशातील व्यवस्थेवर झालेली एक चपराक आहे.
देशभराचा डेटा गोळा करणार
दीपके यांनी स्पष्ट केले की, त्यांनी एका तपासणी सूचीचा फॉर्म तयार केला आहे, ज्याद्वारे शाळांमधील मूलभूत सुविधांची माहिती गोळा केली जाईल. महाराष्ट्र आणि देशभरातील शाळांचा हा डेटा एकत्रित केला जाईल. पुढील टप्प्यात महाराष्ट्रातील इतर तालुक्यांमधील सरकारी शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
सीजेपीचे इन्स्टाग्राम खाते बंद; काही तासांनी सुरू
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शनिवारी सकाळी 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) या संघटनेचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक बंद करण्यात आले. मात्र, काही तासांनंतर हे खाते पुन्हा पूर्ववत करण्यात यश आले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमचा आवाज दाबण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे. अकाऊंट पुन्हा पूर्ववत झाल्यानंतर संघटनेने अधिकृत पोस्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध असो. अशा भ्याड कारवायांना सीजेपी अजिबात घाबरणार नाही, असे संघटनेने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले.
या प्रकारावर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत इन्स्टाग्राम हँडल काढून टाकले. भ्याड लोक ! अशा शब्दांत दीपके यांनी आपला संताप व्यक्त केला.