अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्यात डीपीडीसीच्या बैठकीत खडाजंगी

पुण्यामध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.
अजित पवार-सुप्रिया सुळे यांच्यात डीपीडीसीच्या बैठकीत खडाजंगी
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : पुण्यामध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. या बैठकीला राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या बैठकीत मावळला निधी वाटपात मिळणारे झुकते माप, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार-आमदारांना डीपीडीसीच्या बैठकीत बोलण्याचा अधिकार नसल्याचा दाखवलेला जीआर आदींमुळे ही बैठक गाजली. मात्र, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळले. पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मावळला सर्वाधिक निधी देत असल्याचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके संतप्त झाले. बैठकीनंतर सुनील शेळके म्हणाले की, “इतर तालुक्यांना निधी मिळावा, अशी आमची देखील भावना आहे. परंतु मावळला अधिकचा निधी मिळत असताना आपण कोणताही खोडा घालू नये, अशी माझी विनंती आहे”, असे ते म्हणाले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा सर्वांचा डीपीडीसीचा अनुभव चांगला आहे. पहिल्यादांच असं झालंय. आम्ही यामध्ये श्रीरंग बारणे यांचंही मार्गदर्शन घेतलं. कदाचित असंही होत असेल की, माझ्याकडून आणि अमोल कोल्हेंकडून काही कमतरता राहत असतील. त्यामुळे श्रीरंग बारणेंना जास्त झुकतं मापं दिलं जात. त्यामुळे आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं. या बैठकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मुद्दे मांडण्यास आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही, असा खुलासा केला. शिवाय याबाबतचा जीआरही त्यांनी सर्वांना दाखवला.

शरद पवारांनी विचारला प्रश्न

बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा, असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला होता. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटिसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही प्रश्न विचारले. दरम्यान, शरद पवारांच्यासमोर सुप्रिया सुळें आणि अमोल कोल्हे यांच्याकडून लोकसभा सदस्यांना निधी न दिल्याची तक्रार अजित पवारांकडे करण्यात आली. मावळ लोकसभेला निधी मिळतो आम्हाला का नाही असा सवाल, अमोल कोल्हेंनी उपस्थित केला होता. त्यावर, अजित पवारांनी थेट उत्तर देण टाळले, तर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे, डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.

सुप्रिया सुळेंनीही जीआर दाखवला

अजित पवार यांनी जीआर दाखवतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक जीआर दाखवला. डीपीडीसीच्या बैठकीत प्रत्येक खासदार-आमदाराला ज्याला आमंत्रित केलं आहे, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र, आम्हाला मत देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आम्ही निधीबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, आमचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. या हुकूमशाही विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे, असा पलटवार सुळे यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in